इंटरनेटच्या म्हणजेच मायाजालाच्या या विश्वात मुलांसाठी विविध संकेतस्थळे उपलब्ध आहेत. विविध दूरचित्रवाहिन्या, तसेच विविध संस्था आणि मंडळे मुलांच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. असे असतांना या संकेतस्थळात वेगळे ते काय ? त्यातच आणखी एक नवीन भर ? असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो.
मुलांचा व्यक्तीमत्त्व विकास करणे म्हणजे त्यांचे अंतरंग विकसित करणे होय. विकासासाठी मुलांमध्ये प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, नम्रता यांसारख्या नैतिक मूल्यांची ओळख होणे, एवढा एकच उद्देश नसून त्याचे संवर्धन होणेही महत्त्वाचे आहे. खरेतर आपली संस्कृती एवढी महान आहे की, त्यातील विविध गोष्टी, राष्ट्रपुरुषांची उदाहरणे, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे केले जाणारे आचरण यांप्रमाणे कृती केली आणि ते गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न केला, तरी खऱ्या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकसीत होईल.
`आदर्श नेहेमी स्फूर्ती देतात', असे म्हटले जाते. आज मुलांपुढे चित्रपट अभिनेते, राजकारणी यांसारखे आदर्श आहेत. `द्रष्टा दृष्यवशात् बद्ध:' या सुभाषिताप्रमाणे दूरचित्रवाहिन्या आणि अन्य माध्यमे यांद्वारे चंगळवाद, भ्रष्टाचार, हाणामारी यांचे बालमनावर आक्रमण होत आहे. नकळत तेच संस्कार त्यांच्या अंतर्मनावर कोरले जात आहेत. सध्याच्या एकत्र कुटुंबपद्धती नसलेल्या, व्यस्त आणि अत्यंत धकाधकीच्या जीवनात पालकांनाही प्रत्येक दिवशी मुलांसाठी पुरेसा वेळ देणे कठीण होत आहे. अशा वेळी मुलांचे पालकत्त्व नेमके कोणी घ्यायचे आणि हा संस्काराचा भाग कोणी मुलांवर रुजवायचा अन् सातत्याने बिंबवायचा, हा एक प्रश्नच असतो.
या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर संकेतस्थळाची आवश्यकता लक्षात आली आणि आम्ही या क्षेत्रात उतरलो. `मुलांना केवळ माहिती देणे', असा या संकेतस्थळाचा मर्यादित उद्देश नसून खऱ्या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास होण्यासाठी संकेतस्थळावर विविध सदरे देण्यात आली आहेत. व्यक्तीमत्त्व विकास म्हणजे शारीरिक, मानसिक आणि बौद्धीक अशा स्तरांवर मर्यादित न, त्याही पुढे जाऊन आध्यात्मिक स्तरावरही होणे गरजेचे आहे. आपल्याला सर्वोच्च आणि सातत्याने मिळणारे सुख म्हणजेच आनंद केवळ अध्यात्मशास्त्रच मिळवून देऊ शकते. यासाठी त्यातील अंगांची येथे मांडणी केली आहे.
हे सर्व जाणून घेऊन व्यक्तीमत्त्व विकास खऱ्या अर्थाने व्हावा आणि आपली वाटचाल आनंदप्राप्तीच्या दिशेने व्हावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना ! असे झाल्यास या संकेतस्थळाचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य झाला, असे आम्ही समजू.
आपल्या सहकार्याची आवश्यकता !
या संकेतस्थळावरील माहिती ही विविध ग्रंथांतून घेतली आहे. या माहितीतही काही चुका आणि त्रुटी रहाण्याची शक्यता आहे. एखाद्या ठिकाणी माहितीबद्दल छोटीशी जरी चूक आढळून आल्यास कृपया आपण आम्हाला कळवावे. आपण दाखवलेली प्रत्येक चूक सुधारण्यात येईल. तसेच या संकेतस्थळाविषयी कोणत्याही सूचना / पालट आपण सुचवू शकता. आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हे संकेतस्थळ आम्हाला परिपूर्ण करायचे आहे.
March 27, 2013, 10:50 am
नमस्कार, लहान मुलांसाठी तर खूपच संस्कारमाई माहिती दिलेली आहे.
आणि हिंदू धर्माचे संस्कारांची शिदोरी आपण उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद .