‘अक्षरावरून माणसाची पारख करता येते’, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. नीटनेटकेपणा, शिस्त, कलात्मकता, असे कितीतरी गुण एखाद्याचे अक्षर पाहून आपल्या लक्षात येतात.
‘सुंदर हस्ताक्षर हाच खरा अलंकार आहे’, हा सुविचारही प्रसिद्ध आहे. समर्थ रामदासस्वामी म्हणतात -
ब्राह्मणें (बालके) बाळबोध अक्षर । घडसुनी करावें सुंदर ।
जें देखतांचि चतुर । समाधान पावती ।।
अक्षरमात्र तितुकें नीट । नेमस्त पैस काने नीट ।
आडव्या मात्रा त्या हि नीट । आर्कुलीं वेलांट्या ।।
- दासबोध, दशक १९, समास १, ओवी १, ३
|
अर्थ : मुलांनी प्रत्येक अक्षर घोटून घोटून म्हणजे सराव करून सुंदर करावे. अक्षर पाहून चतुर व्यक्तींना समाधान वाटेल, एवढे ते सुंदर असावे. प्रत्येक अक्षर नीट लिहिलेले असावे. प्रत्येक शब्दात सारखे अंतर असावे. काने आणि आडव्या मात्राही नीट असाव्यात. त्याचप्रमाणे रफार आणि वेलांट्याही नीट काढाव्यात.
हस्ताक्षर चांगले होण्यासाठी काय करावे ?
१. अक्षरे शांतपणे आणि एकाग्रतेने काढावीत.
२. हस्ताक्षर गोल आणि वळणदार काढावे.
३. दोन शब्दांमध्ये पुरेसे अंतर ठेवावे.
४. प्रतिदिन दुरेघी वहीत ५ ओळी तरी शुद्धलेखन लिहावे.
५. चांगले हस्ताक्षर असलेल्या व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे.
६. लिहिण्यासाठी शक्यतो निळ्या शाईची लेखणी (पेन) वापरावी.
अनुभूती
पूर्वी वाईट असलेले अक्षर नियमितपणे वहीत नामजप लिहिल्याने चांगले होणे : ‘सप्टेंबर २००५ मध्ये मी प्रत्येक रविवारी संस्कारवर्गाला जायचो. वर्ग घेणार्या ताईने आम्हाला वहीत प्रतिदिन २ पाने कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप लिहिण्यास सांगितले होते. पूर्वी माझे अक्षर पुष्कळ वाईट होते; परंतु मी नियमितपणे वहीत नामजप लिहिल्याने माझे अक्षर चांगले झाले.’ - कु. निखिल भोसले (वय १२ वर्षे), मिरज
मुलांनो, नामजप लिहित असतांना सात्त्विकता वाढून एकाग्रतेने चांगले अक्षर काढण्याचा प्रयत्न होतो. तुम्हीही वहीत प्रतिदिन कुलदेवी आणि दत्त ( ‘श्री गुरुदेव दत्त।’ असा ) यांचा नामजप प्रत्येकी १ पाठपोट पान लिहा ! .
August 21, 2012, 7:35 pm
सुंदर सुटसुटीत लेख. आम्ही हस्ताक्षर क्षेत्रात गेली १० वर्षे काम करीत आहोत.