मुलांनो, आपण पहातो की, दोन मुले सारखीच बुद्धीमान (हुशार) असली, तरीसुद्धा त्यापैकी एकाला चांगले गुण मिळतात, तर दुसर्याला अल्प. अभ्यासात मिळणारे यश हे बर्याचदा अभ्यास करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. पुढील लेखात याविषयीची काही सूत्रे दिली आहेत, ती अवश्य अभ्यासा !
अ. प्रत्येक विषयाचा अभ्यास आवडीने आणि मनापासून करावा : ‘ज्या विषयाचा अभ्यास करावयाचा आहे किंवा जी कला शिकावयाची आहे, तिचे महत्त्व आणि लाभ समजून घ्यावेत. त्यानंतर अभ्यासास प्रारंभ करावा. आवडीने आणि मनापासून अभ्यास केल्यामुळे विषयाचे आकलन लवकर होते.’ - कु. मधुरा भोसले
आ. सकाळची वेळ शांत असते, तसेच रात्रभर झोप झाल्याने शरीर आणि मन दोन्ही तरतरीत असतात; म्हणून या वेळी अवघड वाटणार्या विषयाचा अभ्यास करावा. जो विषय समजत नाही किंवा अवघड वाटतो, त्या विषयास अधिक वेळ द्यावा. तो विषय किंवा ती प्रश्नोत्तरे दोन-तीन वेळा वाचावीत. नंतर त्यावर वर्गातील बुद्धीमान विद्यार्थी आणि त्या विषयाचे शिक्षक यांच्याशी चर्चा करावी.
इ. अभ्यासातील समजलेल्या सूत्रांवर (मुद्यांवर) चिंतन करून ती सूत्रे स्वतःच्या भाषेत लिहून काढावीत. यासाठी प्रथम एखादा परिच्छेद वाचून १-२ ओळींत त्यातील महत्त्वाची सूत्रे लिहिण्याची सवय लावून घ्यावी. नंतर संपूर्ण धड्यातीलच मुख्य सूत्रे लिहून काढावीत.
ई. एखाद्या विषयावर साधारणपणे ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ मन एकाग्र करणे अवघड असते. त्यामुळे मध्ये मध्ये थोडा वेळ विश्रांती घ्यावी. विश्रांतीच्या काळात ५ मिनिटे प्रार्थना आणि नामजप करावा.
उ. वाचनानंतर लेखन, लेखनानंतर वाचन किंवा पाठांतर, पाठांतरानंतर वाचन, परत लेखन, असा आलटून-पालटून अभ्यास करावा.
वरील सूत्रे लवकरात लवकर आचरणात आणून उज्वल यशाकडे वाटचाल करूया !
संदर्भ: सनातन-निर्मित-ग्रंथ ' अभ्यास कसा करावा? '
October 19, 2012, 10:58 am
I like your tips