इतिहास
पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, श्रीविष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव चित्रकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढ एकादशीला उपवास करावा लागला. त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला मारले. ही जी शक्तीदेवी तीच एकादशी देवता आहे. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात.
व्रताचा शास्त्रोक्त विधी
आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त रहावे. एकादशीला प्रातःकाळी स्नान करावे, उपोषण करावे, तुलसी वाहून श्रीविष्णूपूजन करावे व रात्री हरिभजनात जागरण करावे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे.
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, डिसेंबर २००५)
July 10, 2011, 2:35 am
आवडले, खूपच आवडले, आपली बरीचशी मुले इंग्रजी शाळेत शिकून असंस्कारित राहिली आहेत. आताची मुले आणि खरे म्हटले तर आमच्या सारखी मोठी माणसे सुद्धा तुम्ही देत असलेल्या माहितीने उपकृत होतील. वेळोवेळी अशीच माहिती द्यावी. वेळेवर मिळालेल्या माहितीचे महत्व संस्कारात खूप आहे. आभार........ग. का. जोशी. मुंबई.